Wednesday, April 15, 2020

क्वारंटाईन चे दिवस - ६

तिला सकाळी जाग आली. पक्षांचा किलबिलाट ऐकत थोडा वेळ  ती तशीच अंथरूणात पडून राहिली. तिच्या मनात विचार आला, 'ह्यापूर्वी असा किलबिलाट कधी ऐकूच येत नव्हता'. चला आवरावे झालं असे म्हणत ती अंथरूणातून बाहेर पडली. जेमतेम सकाळची आन्हिक आटोपतायत तोवरच तिला वर्दी आली. आता मात्र वेळ गमाऊन तिला चालणार नव्हते. 'ड्यूटी फर्स्ट' हे तर तिचे ब्रीदवाक्य होते. किती जणांची सुरक्षा तिच्यावर अवलंबून होती. तिने चटचट तयारी करायला सुरुवात केली. इतरांच्या सुरक्षेची काळजी घेताना तिला स्वतःलाही सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. तिने तिची तयारी करायला सुरवात केली. सर्वप्रथम संपूर्ण चेहरा झाकणारा स्कार्फ नीट गुंडाळून घेतला मग अलगदपणे तिने घराचा दरवाजा उघडला. तिथे समोरच एका कापडी पिशवीत ती वस्तू होती. शरीराचा कमीतकमी स्पर्श होईल अशी काळजी घेत तिने दोन बोटांच्या चिमटीत ती पिशवी उचलली आणि थेट तिच्या प्रयोगशाळेत नेली. थेट सिंकमध्ये अलगदपणे तिने पिशवीतील ऐवज बाहेर काढला. वस्तू ठेवलेली ती पिशवी तिने थेट रसायनाने भरलेल्या बकेट मध्ये बुडवून ठेवली. मग आधी तिने जंतूनाशक द्रावणाने स्वतःचे हात स्वच्छ केले. प्रचंड जोखमीचे काम असल्यामुळे अतिशय काळजी घेणे गरजेचे होते. त्यानंतर पुन्हा जंतूनाशक वापरून तिने ती वस्तू काळजीपूर्वक स्वच्छ केली. कुठलाही भाग, किंचीतसा कोपराही सुटलानाही ना... याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली मग मात्र तिने आयुध हाती घेतले. श्वाससुद्धा रोखून धरत अलगद तिने ती वस्तू हातात धरली आणि एखाद्या  सर्जनच्या कुशलतेने कोपर्याचा एक टवका उडवला. आतील ऐवज जराही सांडणार नाही याची खात्री करत आधीच काढून ठेवलेल्या एका भांड्यात तिने अलवारपणे तो ओतून घेतला. मात्र असे करताना चुकूनही स्वतःच्या शरीराचा स्पर्श त्याला होणार नाही ह्याची काळजी घेतली. आतील ऐवज काढून घेतल्यावर रिकामी झालेली ती वस्तू तिने तडक लांब नेऊन डस्टबीन मध्ये डिस्पोझ ऑफ केली. पुन्हा एकदा जंतूनाशक द्रावणाने हात स्वच्छ करून  ती प्रयोगशाळेत परतली......आणि
.
.
.
.
.
.
.
आणि, भांड्यात काढलेले दूध गॅसवर तापत ठेऊन दुसर्या गॅसवर तीने चहाचे आधण चढवले. 😂😂😂😂😂
मंडळी तुम्हाला काय वाटले, ती बाॅम्बस्क्वाॅड मधील अधिकारी होती? 
.
.
कोरोनाच्या भितीने साधी दुधाची पिशवी सुध्दा जिवंत बाॅम्ब असल्यागत हाताळणारी....पूनम.
.
तर मंडळी काळजी घ्या. बाहेरून घरात येणारी प्रत्येक वस्तू जिवंत बाॅम्ब असल्यागत काळजीपूर्वक हाताळा. साबणाने वीस सेकंद चोळून हात स्वच्छ करत रहा. आणि अर्थातच घरी रहा.....सुरक्षित रहा.

No comments:

Post a Comment