ब्ल्यूबेरी केक
आपण सगळेच सध्या आपापल्या घरात बंद आहोत. अर्थात सगळे बंद असले म्हणून पोटोबा काही बंद नसतात ना......ते तर आणखीनच उत्साहात गुरगुर करत असतात. घरात असलेल्या सगळ्याच मंडळींना थोड्या थोड्या वेळाने तोंडात टाकायला काही तरी हवे असते. मग अशा वेळेस काही तरी च्यावम्याव करून ठेवलेले असले तर आपल्या पाठचा ससेमिरा जरा कमी होतो.
तर मंडळी, हा घ्या एक अगदी सोप्पा केक, जो घरात असलेल्या अगदी रोजच्या गोष्टींमधून पटकन होईल.....तुम्हाला काही स्पेशल साहित्य आणायला बाहेर जायला नको आणि जास्ती मेहनतही नको. एकदम लुसलुशीत आणि स्वादिष्ट.
साहित्य
मैदा - दिड कप (1&1/2 cup)
साखर - एक कप (1cup)
घट्ट दही - एक कप (1cup)
कुठलेही रिफाईंड तेल - अर्धा कप (1/2 cup)
बेकींग पावडर - एक चमचा (1 teaspoon)
खायचा सोडा - अर्धा चमचा (1/2 teaspoon)
व्हॅनिला इसेन्स - एक चमचा (1 teaspoon)
ब्लूबेरी/क्रॅनबेरी/चोकोचिप्स/टूटीफ्रूटी/नटस् - ह्यापैकी जे तुमच्या घरी असेल ते अर्धा कप
(ह्यापैकी काहीही नसले तरी नुसता केक सुध्दा छान लागतो.
कृती:
एका मोठ्या बाऊल मध्ये दही आणि साखर एकत्र करून तासभर ठेऊन द्या. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. मैदा दोन वेळा चाळुन घ्या. जे काही नटस् अथवा बेरीज तुम्ही घालणार असाल ते मैद्यात नीट मिसळून ठेवा. एका 7"×4" च्या केक टिनला तुप अथवा बटर चोळून त्यावर मैदा भुरभुरून ठेवा. दही-साखरेच्या मिश्रणात बेकींग पावडर आणि खायचा सोडा घालून नीट मिसळून घ्या आणि ४-५ मिनीटे थांबा. मिश्रणावर छानसे बुडबुडे आले की मग त्यांत तेल घाला, व्हॅनिला इसेन्स घाला आणि फेटून घ्या. मग थोडा थोडा मैदा मिसळून फेटत रहा. संपूर्ण मैदा संपला की थोडावेळ फेटा. मिश्रण ओतण्याच्या consistency चे झाले पाहिजे. म्हणजे साधारण घट्टसर पिठले कींवा इडलीच्या पिठासारखे. मैदा फेटायला सुरवात करण्याआधी ओव्हन 200°C ला तापत ठेवा. तयार झालेले मिश्रण केक टिन मध्ये ओतून घ्या. ओव्हनमध्ये केकटिन ठेवण्याआधी ओट्यावर हलक्या हाताने दोन-तीन वेळा आपटून घ्या म्हणजे मिश्रण एकसमान पसरेल आणि त्यांत हवेचे बुडबुडे राहणार नाहीत. 200°C ला तीस ते पस्तीस मिनीटे बेक करा. काढण्याआधी एखादी टुथपिक कींवा सुरी केकच्या मध्यभागी खुपसून पहा. नीट स्वच्छ बाहेर आली तर केक झाला. जर त्याला मिश्रण चिकटले असले तर अजून ५ मिनीटे ठेवा. सुरी स्वच्छ बाहेर आली की ओव्हन बंद करा. पाच मिनिटांनी केकटिन बाहेर काढा. १० मिनीटांनी केक टिन मधून सोडवून वायर रॅक वर थंड होण्यासाठी ठेवा. आणि हो, केक थंड होईपर्य॔त घरातल्या मंडळींना मात्र थोडे लांब ठेवा कारण केक थंडच छान लागतो.
हं....आणि ह्या क्वारंटाईनच्या दिवसात जर मैदा नसेल घरात तर प्लीज मैदा आणण्यासाठी बाहेर पडू नका हं. तुम्ही कणिक वापरून पण करू शकाल केक. फक्त एकदम हलका नाही होणार. आणि हे कोरोनाचे संकट टळल्यानंतर मग नक्की मैदा वापरून करून पहा.
So, stay at home....stay safe and eat well.
No comments:
Post a Comment