Wednesday, April 15, 2020

क्वारंटाईन चे दिवस - ६

तिला सकाळी जाग आली. पक्षांचा किलबिलाट ऐकत थोडा वेळ  ती तशीच अंथरूणात पडून राहिली. तिच्या मनात विचार आला, 'ह्यापूर्वी असा किलबिलाट कधी ऐकूच येत नव्हता'. चला आवरावे झालं असे म्हणत ती अंथरूणातून बाहेर पडली. जेमतेम सकाळची आन्हिक आटोपतायत तोवरच तिला वर्दी आली. आता मात्र वेळ गमाऊन तिला चालणार नव्हते. 'ड्यूटी फर्स्ट' हे तर तिचे ब्रीदवाक्य होते. किती जणांची सुरक्षा तिच्यावर अवलंबून होती. तिने चटचट तयारी करायला सुरुवात केली. इतरांच्या सुरक्षेची काळजी घेताना तिला स्वतःलाही सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. तिने तिची तयारी करायला सुरवात केली. सर्वप्रथम संपूर्ण चेहरा झाकणारा स्कार्फ नीट गुंडाळून घेतला मग अलगदपणे तिने घराचा दरवाजा उघडला. तिथे समोरच एका कापडी पिशवीत ती वस्तू होती. शरीराचा कमीतकमी स्पर्श होईल अशी काळजी घेत तिने दोन बोटांच्या चिमटीत ती पिशवी उचलली आणि थेट तिच्या प्रयोगशाळेत नेली. थेट सिंकमध्ये अलगदपणे तिने पिशवीतील ऐवज बाहेर काढला. वस्तू ठेवलेली ती पिशवी तिने थेट रसायनाने भरलेल्या बकेट मध्ये बुडवून ठेवली. मग आधी तिने जंतूनाशक द्रावणाने स्वतःचे हात स्वच्छ केले. प्रचंड जोखमीचे काम असल्यामुळे अतिशय काळजी घेणे गरजेचे होते. त्यानंतर पुन्हा जंतूनाशक वापरून तिने ती वस्तू काळजीपूर्वक स्वच्छ केली. कुठलाही भाग, किंचीतसा कोपराही सुटलानाही ना... याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली मग मात्र तिने आयुध हाती घेतले. श्वाससुद्धा रोखून धरत अलगद तिने ती वस्तू हातात धरली आणि एखाद्या  सर्जनच्या कुशलतेने कोपर्याचा एक टवका उडवला. आतील ऐवज जराही सांडणार नाही याची खात्री करत आधीच काढून ठेवलेल्या एका भांड्यात तिने अलवारपणे तो ओतून घेतला. मात्र असे करताना चुकूनही स्वतःच्या शरीराचा स्पर्श त्याला होणार नाही ह्याची काळजी घेतली. आतील ऐवज काढून घेतल्यावर रिकामी झालेली ती वस्तू तिने तडक लांब नेऊन डस्टबीन मध्ये डिस्पोझ ऑफ केली. पुन्हा एकदा जंतूनाशक द्रावणाने हात स्वच्छ करून  ती प्रयोगशाळेत परतली......आणि
.
.
.
.
.
.
.
आणि, भांड्यात काढलेले दूध गॅसवर तापत ठेऊन दुसर्या गॅसवर तीने चहाचे आधण चढवले. 😂😂😂😂😂
मंडळी तुम्हाला काय वाटले, ती बाॅम्बस्क्वाॅड मधील अधिकारी होती? 
.
.
कोरोनाच्या भितीने साधी दुधाची पिशवी सुध्दा जिवंत बाॅम्ब असल्यागत हाताळणारी....पूनम.
.
तर मंडळी काळजी घ्या. बाहेरून घरात येणारी प्रत्येक वस्तू जिवंत बाॅम्ब असल्यागत काळजीपूर्वक हाताळा. साबणाने वीस सेकंद चोळून हात स्वच्छ करत रहा. आणि अर्थातच घरी रहा.....सुरक्षित रहा.

Friday, April 10, 2020

क्वारंटाईनचे दिवस - 5


Muskmelon milkshake 

Muskmelon म्हणजेच आपल्या मराठीत खरबूज किंवा चिबूड. अंगतील उष्णता कमी करणारे हे फळ म्हणजे उन्हाळ्यातील अमृतच.  सध्या जरी सगळे घरी असले तरी दिवस बऱ्यापैकी गडबडीत जातो. नेहमीच्या कामांशिवाय अनेक वेळ होणारी चहा-कॉफी, घरातील मदतनीस मावशी नसल्यामुळे करावी लागणारी वाढीव धुणे, भांडी, केर, लादया इ. कामे शिवाय स्वयंपाक.. नाश्ता ......अधेमध्ये काहीतरी स्पेशल करायची फर्माईश .. अबब.. दमले बाई ... शिवाय अनेक जणांसाठी वर्क फ्रॉम होम आहेच. त्यामुळे हे सगळे सांभाळून ऑफिसचे कामही. आणि खरे सांगू का, आपल्या सर्वांच्या मनात असलेली ती एक अनामिक भिती .. करोंना ची .  कितीही विनोद केले तरीही खोल खोल आत एक सुप्त भय लपलेले आहेच. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यापैकी अनेकांना आंमलपित्त म्हणजेच अॅसिडिटी चा त्रास ही सतावतोय.  तर मंडळी ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना तुम्हाला अतिशय उपयोगी आसणारे एक चविष्ट फळ म्हणजेच हे आपले खरबूज .
काम करून दमल्यावर, घडिभर विसवताना हातात ह्या खरबूज मिल्कशेकचा ग्लास घ्या आणि सारा थकवा क्षणात दूर पळवा. कृती अगदीच सोप्पी. खरबुजच्या फोडी दोन कप, दूध एक कप आणि आवडीप्रमाणे साखर. हे सर्व  मिक्सर् मधुन फिरवून घ्या. बाकी काही, म्हणजे वेलची, वॅनीला इ. काही म्हणजे काही टाकू नका. कारण खरबुजाचा स्वतःचाच स्वाद इतका सुंदर असतो की इतर काशाचीच गरज लागत नाही. हवे असल्यास थोडासा बर्फ. बस.. घुटक्या घुटक्यांनी ह्या चविष्ट पेयाचा आस्वाद घ्या आणि तारोताजा होवून कामाला भिडा.......

दिवस क्वारंटाईनचे - 4


 ब्ल्यूबेरी  केक

आपण सगळेच सध्या आपापल्या घरात बंद आहोत. अर्थात सगळे बंद असले म्हणून पोटोबा काही बंद नसतात ना......ते तर आणखीनच उत्साहात गुरगुर करत असतात. घरात असलेल्या सगळ्याच मंडळींना थोड्या थोड्या वेळाने तोंडात टाकायला काही तरी हवे असते. मग अशा वेळेस काही तरी च्यावम्याव करून ठेवलेले असले तर आपल्या पाठचा ससेमिरा जरा कमी होतो. 
तर मंडळी, हा घ्या एक अगदी सोप्पा केक, जो घरात असलेल्या अगदी रोजच्या गोष्टींमधून पटकन होईल.....तुम्हाला काही स्पेशल साहित्य आणायला बाहेर जायला नको आणि जास्ती मेहनतही नको. एकदम लुसलुशीत आणि स्वादिष्ट. 

साहित्य 
मैदा - दिड कप (1&1/2 cup)
साखर - एक कप (1cup)
घट्ट दही - एक कप (1cup)
कुठलेही रिफाईंड तेल - अर्धा कप (1/2 cup)
बेकींग पावडर - एक चमचा (1 teaspoon)
खायचा सोडा - अर्धा चमचा (1/2 teaspoon)
व्हॅनिला इसेन्स - एक चमचा (1 teaspoon)
ब्लूबेरी/क्रॅनबेरी/चोकोचिप्स/टूटीफ्रूटी/नटस् -  ह्यापैकी जे तुमच्या घरी असेल ते अर्धा कप
(ह्यापैकी काहीही नसले तरी नुसता केक सुध्दा छान लागतो.

कृती:
एका मोठ्या बाऊल मध्ये दही आणि साखर एकत्र करून तासभर ठेऊन द्या. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. मैदा दोन वेळा चाळुन घ्या. जे काही नटस् अथवा बेरीज तुम्ही घालणार असाल ते मैद्यात नीट मिसळून ठेवा. एका  7"×4" च्या केक टिनला तुप अथवा बटर चोळून त्यावर मैदा भुरभुरून ठेवा. दही-साखरेच्या मिश्रणात बेकींग पावडर आणि खायचा सोडा घालून नीट मिसळून घ्या आणि ४-५ मिनीटे थांबा. मिश्रणावर छानसे बुडबुडे आले की मग त्यांत तेल घाला, व्हॅनिला इसेन्स घाला आणि फेटून घ्या. मग थोडा थोडा मैदा मिसळून फेटत रहा. संपूर्ण मैदा संपला की थोडावेळ फेटा. मिश्रण ओतण्याच्या consistency चे झाले पाहिजे. म्हणजे साधारण घट्टसर पिठले कींवा इडलीच्या पिठासारखे. मैदा फेटायला सुरवात करण्याआधी ओव्हन 200°C ला तापत ठेवा. तयार झालेले मिश्रण केक टिन मध्ये ओतून घ्या. ओव्हनमध्ये केकटिन ठेवण्याआधी ओट्यावर हलक्या हाताने दोन-तीन वेळा आपटून घ्या म्हणजे मिश्रण एकसमान पसरेल आणि त्यांत हवेचे बुडबुडे राहणार नाहीत. 200°C ला तीस ते पस्तीस मिनीटे बेक करा. काढण्याआधी एखादी टुथपिक कींवा सुरी केकच्या मध्यभागी खुपसून पहा. नीट स्वच्छ बाहेर आली तर केक झाला. जर त्याला मिश्रण चिकटले असले तर अजून  ५ मिनीटे ठेवा. सुरी स्वच्छ बाहेर आली की ओव्हन बंद करा. पाच मिनिटांनी केकटिन बाहेर काढा. १० मिनीटांनी केक टिन मधून सोडवून वायर रॅक वर थंड होण्यासाठी ठेवा. आणि हो, केक थंड होईपर्य॔त घरातल्या मंडळींना मात्र थोडे लांब ठेवा कारण केक थंडच छान लागतो.
हं....आणि ह्या क्वारंटाईनच्या दिवसात जर मैदा नसेल घरात तर प्लीज मैदा आणण्यासाठी बाहेर पडू नका हं. तुम्ही कणिक वापरून पण करू शकाल केक. फक्त एकदम हलका नाही होणार. आणि हे कोरोनाचे  संकट टळल्यानंतर मग नक्की मैदा वापरून करून पहा.
So, stay at home....stay safe and eat well. 

Sunday, April 5, 2020

दिवस क्वारंटाईनचे - ३


माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,
आम्ही सर्व भारतीय शपथ घेतो की ह्या कोरोनाच्या जागतिक संकटाशी आम्ही एकजुटीने लढा देऊ. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करू आणि प्रशासनावरचा ताण कमी करू. स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी झटणार्या प्रत्येकाचे आभार. सर्व डाॅक्टर्स, नर्सेस् , हाॅस्पिटल कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवा पुरवणार्या प्रत्येक व्यक्तीची मी ॠणी आहे.
त्या जगन्नियंत्याला हिच प्रार्थना की  ह्या महाभयंकर संकटातून संपूर्ण जगाला लवकर सोडव. सर्वांच्या प्रियजनांना सुखरूप ठेव. जसे भट्टीतून तापल्यानंतर सोने झळाळून उठते तसे ह्या संकटातून तावून सुलाखून निघालेले हे जग क्षुद्र हेवेदावे, द्वेष ह्यापासून मुक्त होवो आणि संपूर्ण मानवजात ह्या सश्यशामला पृथ्वीला तीचे नैसर्गिक वैभव परत मिळवून देण्यासाठी झटो.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः

.
.
.
#gocorona #gocoronago 

Friday, April 3, 2020

दिवस क्वारंटाईनचे - 2


आता हे काय.. ..???? ह्या गोष्टींचा एकमेकांशी काय संबध ? किंवा ह्या गोष्टींचा कोरोना क्वारंटाईनशी तरी काय संबध असा विचार तुम्ही नक्कीच करत असाल...
.....तर महाराजा, सध्या कोरोना कृपेने धुणी-भांडी, केर-लाद्या इ. कामे आस्मादिक स्वहस्ते करत असल्यामुळे बरेच दिवस गायब असलेल्या गोष्टी, ह्या कपाटाखालून, पलंगाखालून बाहेर निघत आहेत. हे पुस्तक बरेच दिवस शोधत होते मग वाटलं कोणीतरी बहुतेक वाचायला म्हणून नेले अन् विसरले बहुतेक. हि लिपस्टिक, अगदी नविन होती हरवली तेव्हा. बरीच शोधली आमच्या मदतनीस मावशींनाही सांगून झाले की पलंगाखाली वगैरे नीट केरसुणी फिरवून बघा प्लीज. पण त्यांनी तर ग्वाही दिली की, "मी रोज इतका स्वच्छ कचरा काढते, नीट केरसुणी आडवी फिरवते की वो पलंगाखालून... तिथे पडली असती तर दुसऱ्या दिवशीच बाहेर आली असती". 😂😂😂 पेन ही तर अगदीच किरकोळ गोष्ट... ते हरवायचेच. हा कंगवा पण माझा लाडका. तो हि बरेच दिवस गायब होता. तर मंडळी,  ह्या क्वारंटाईन काळात हरवले  ते गवसण्याचा सुखद अनुभव मिळतोय मला. तुम्हाला??????????

 

Thursday, April 2, 2020

दिवस क्वारंटाईनचे - १




दिवस क्वारंटीनचे

कोऱोनाने  आख्या जगाची सगळीच समीकरणे उलटी पालटी करून टाकली. जगभर हाहा:कार माजला. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती झाली पण म्हणून माणूस जगायचे थोडेच ना थांबवितो? ह्या परिस्थितिला सुसह्य बनवण्याचे अनेक उपाय आपण शोधून काढले. घरी राहण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे बरीचश्या राहून गेलेल्या गोष्टी करायला सगळ्यांनी सुरवात केली आणि त्या सोशल मीडिया वर टाकायला ही. आणि मग एकाचे बघून दूसरा अशा अनेक रेसिपीज वायरल व्हायला सुरवात झाली. अशीच एक गोष्ट म्हणजे DALGONA कॉफी.  अनेक जणाच्या पोस्ट बघून मग मलाही मोह झालाच. आधीच कॉफी खूप आवडीची आणि त्यात नवीन काहीतरी प्रकार करून बघायचा म्हणजे मज्जाच की. अशा प्रकारे आस्मादिकांची DALGONA कॉफी तयार झाली. कृती अगदीच सोप्पी जर तुमच्याकडे बीटर असेल. नाहीतर हात खांद्यातून दुखवून घ्यायची तयारी पाहिजे. दीड चमचा इन्स्टंट कॉफी, दोन चमचे साखर, दोन चमचे गरम पाणी ही एकत्र करून खूप खूप फेटणे, अगदी घट्ट फेस तयार झाला पाहिजे. बीटर असेल तर हे एखाद्या मिनिटाचे काम नाहीतर .. फेटत रहा..... फेटत रहा .. फेटत रहा :)
दुसऱ्या छानश्या ग्लासात मस्त बर्फ आणि थंडगार दूध घ्या आणि अलगद हा कॉफीफेस त्यावर ओता .. बस. तुमची DALGONA कॉफी तय्यार. गुगलबाबा सांगतो की ही कॉफी साऊथ कोरियाची खोज आहे. असो बापडी. आपल्याला काय, झक्कास कॉफी मिळाल्याशी मतलब .. काय ?

Wednesday, July 4, 2018

Mother

Here I am sitting in front of my mother-in-law. She is sleeping... atleast it looks like that. But I know she is not having sound sleep. She is disturbed. Having disturbed sleep. Very very restless. In her sleep, she is moving her hands, moving her fingers, muttering something. I know she is happy inside. She has had her favorite lunch of fish curry, fried fish and rice.... after so long. To be precise, after nearly one and half month. One and half month of hospitalization. One and half month lying on the same bed in that confined space, seeing the same piece of sky from the same window. She is back home yesterday. Today I made her favorite fish for lunch. She ate well. She even said so... appreciated food... home food. And now in her sleep, she is remembering her sons; she wants her other son to have fish curry..  May be he too must have had good food for lunch. May be he might have had fish curry... yes, his wife is good cook too. But she is MOTHER. If she eats something good, she wants that her son should have it too. In her sleep she is moving hands as if she is serving someone. She is muttering her son's name in her sleep. Urging him to have some more fish, That is Mother's heart. Mother always thinks of her child. Always...whatever her condition is.. even if she herself is not well. In half consiousness too, she remembers that her child loves fish and she shouldn't eat same without offering it to him.